# उषःपान अर्थात सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे !
- drprafullpatil
- Dec 22, 2017
- 2 min read

# उषःपान अर्थात सकाळी उपाशीपोटी पाणी पिणे !
तहान लागल्यावरच २-३ घोट पाणी प्यावे भूक लागल्यावरच भूकेनुसार योग्य मात्रेत जेवण करावे हे दोन्ही नियम आतापर्यंत आपणांस कळाले,पण मग,सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायची सवय योग्य आहे की नाही सकाळी म्हणजे पहाटे म्हणजे अगदी ब्राम्हमुहुर्तावर अर्थात सकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत उठल्यास ह्या वेळी पाणी प्यावे असा शास्रात नियम आहे ! व त्यास उषःपान असे म्हणतात. ह्या वेळी पिलेल्या पाण्याने शरीर शुद्धी होऊन अनेक रोगांपासून मुक्ती मिळते.
परंतु आजकाल ह्या वेळेस कोणीही उठत नाही ! उलट उशीरा उठूनही १/२ ते १ लिटर पाणी पितात. ( हे पुर्णतः चुकीचे आहे !) आपण उठू तोच ब्राम्ह मुहुर्त ! आणि आपण पिऊ तेच उषःपान ! आणि तेही आरोग्यकारक !! .....असे समजणे चुकीचे आहे ! अर्थात सकाळी ६ नंतर उठल्यावर पिलेल्या पाण्याचे फायदे होत नाहीत उलटपक्षी, कफकाळात अधिक मात्रेत जलपान केल्यास कफाचे विकार संभवतात. सध्या, त्याचा मूळ शास्रोक्त प्रकार विसरला जाऊन, फक्त पोटात पाणी भरुन शौचाला जोर (प्रेशर) तयार करणे हा होतो. किंवा शरीरशुद्धी साधली जाईल असा विचार करुन, लघवी निर्माण व्हावी म्हणून जलपुरवठा करणे एवढेच साधले जाते. हा प्रकार दीर्घकाळ झालेला चांगला नाही ! ह्यामुळे शौचाचा नैसर्गिक वेग येत नाही ! तरी सकाळी ६ नंतर सुद्धा पाणी प्यायचेच असेल तर = १ ग्लास कोमट पाणी प्यावे. कोमट म्हणजे = पाण्यात बोट घातल्यास गरमपणा जाणवेल पण फुंकर न मारता पिता येईल एवढे उष्ण ! अनेक जण सकाळी गरम पाण्यात मध टाकून पितात ! टिव्हीवर जाहीरातींमध्ये डाबर कंपनीही असे करण्याचा सल्ला देते ! हे योग्य आहे का = नाही, त्यात गरम पाण्यात मध टाकू्न पिऊ नये.
( गरम पाणी व मध एकत्र घेऊ नये, नियम = मध कधीही गरम द्रव-घन पदार्थांसह घेऊ नये ! पाणी गार झाल्यावर मध टाकलेला चालतो )
जाहीरातींमध्येही आयुर्वेदातील शास्राचा भाग सोडून जनमानसातील प्रचलित प्रकारांचा पाठपुरावा केलेला दिसतो, हा केवळ आणि केवळ अशास्रोक्त व धंदेवाईक भाग आहे ! वात प्रकृतीच्या व्यक्तींना कोष्ठबद्धता ही बहुधा आहार व शरीरातील रुक्षतेमुळे असते अर्थात आहारात तैल-तूपाचा कमी वापर व त्यामुळे, शरीरातील पचन व मलनिःसरण संस्थेत स्निग्धपणा नसणेकमी असणे ह्यामुळे होतो. त्यांनी १ ग्लास कोमट पाण्यात १ ते २ चमचे कोमट करुन पातळ केलेले गाईचे तूप घ्यावे. यानेही उपाय न झाल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना कोमट पाणी पिल्यास चालेल. मलावष्टम्भाच्या तक्रारी जाणवत असल्यास प्रथमतः ३०-५० काळ्या मनुक्यांचा कोळ घ्यावा किंवा खावेत व कोमट पाणी प्यावे. कफ प्रकृतीच्या व्यक्तींना गरम वा कोमट पाणी चालेल. त्यांनी कफविकार टाळण्यासाठी, वजन आटोक्यात ठेवण्यासाठी गरम करुन गार झालेल्या पाण्यात मध मिश्रित करुन घ्यावा. उपाशीपोटी उन्हाळा सोडल्यास इतर ऋतुत शक्यतो गार पाणी पिऊ नये. त्याने अग्निमांद्य होते अर्थात भूक मंदावते. तांब्याच्या भांड्यात रात्रभर ठेवलेले पाणी १ ग्लासभर पिणे हे ही आरोग्यकर आहे.

नियम तोच ब्राम्हमूर्हुतावर अर्थात सकाळी ४.३० ते ५.३० पर्यंत पाणी प्यावे ! मग हेच पाणी उशीरा पिल्याने अजीबात फायदा होणार नाही का = तर होईल पण तेवढा नाही ! हे जलपान केल्यावर लगेचच गरम-गरम चहा पिऊ नये. आयुर्वेदाच्या आहार नियमांनुसार गरम-गार पदार्थ एकामागे एक लगेचच घेऊ नयेत त्याने उष्ण-शीत व्यत्यासात संकर दोष संभवतो.
댓글